गुरुवार, १० जून, २०१०

नक्षलवादातील बालमजुरी



नक्षलवादातील बालमजुरी

प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर अथवा नक्षली हल्ल्यानंतर आपल्याकडे 'साग्रसंगीत' चर्चा सुरू होते. अगदी दंतेवाडाचेच घेऊ, नक्षलींनी हत्याकांड केले मग याचे रकानेच्या रकाने वृत्तपत्रांतून लिहिले गेले. वाहिन्यांच्या चर्चासत्रांचा विषयही हाच होता. सुटा-बुटातील हाय-फाय, पॉलिश्ड आणि फाडफाड इंग्रजी बोलणार्‍या बुद्धीवाद्यांनी यावर गंभीर चर्चाही केली पण मुळात प्रश्न हा आहे की इतका मोठा आणि धाडसी हल्ला माओवाद्यांनी अचानक तर केला नाही, यासाठी नक्कीच कोणती तरी योजना असेल. ब्रेकफास्टला ठरविली आणि लंचच्यावेळी हत्याकांड घडवून डिनरला परत आपल्या नक्षलवादी कॅम्पमध्ये परतली इतकी ही कृती नक्कीच नाही.
भारतात पशुपती ते तिरुपती 'रेड झोन' किंवा रेड कॉरिडोरला आपल्या तथाकथित क्रांतिकारक मार्गाने क्रांती घडवू पाहणार्‍या या नक्षलवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री, संसाधन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतक प्रशिक्षित मनुष्यबळ येते कुठून याचा शोध आणि यावर उपाय अत्यंत आवश्यक आहे, नव्हे तर ती निकडीची गरज बनली आहे. जोपर्यंत या कारणांचा शोध घेतला जात नाही तोपर्यंत दृश्य परिणामांची चर्चा आणि नक्षली हल्ल्यांना बळी पडणार्‍या नागरिक-जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचेच कामआपल्याला करावे लागणार आहे.
भारतातील अत्यंत दुर्गमआणि मागास भागांत आपली केंद्रं बनविणार्‍या नक्षलवादी गटांत अनेकदा वय वर्ष १४ ते १६ किंवा त्याहीपेक्षा लहान वयोगटातील गणवेशधारी शस्त्रधारी माओवादी सुरक्षा दलांना आढळून आले आहेत. युनिसेफने आपल्या एका अहवालात जगभर सुमारे २ लाख पन्नास हजार बालकांना विविध हिंसक गटांनी आपल्या गटात जवान म्हणून भरती केली आहे. या भयंकर प्रकाराचे एका जर्मन अभ्यासकाने अत्यंत वास्तववादी वर्णन केले आहे. हेनरीक बोल्फगँग हा जर्मन अभ्यासक भारतातील पूर्वोत्तर राज्यांत एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या भागातील समस्यांचा अभ्यास करत असताना 'कुकी नॅशनल आर्मी' या फुटीर संघटनेने २००३ साली मणिपूर येथून हेनरीकचे अपहरण केले. तब्बल १८ दिवस हेनरीक या अतिरेक्यांच्या बंधनात होता. हेनरीकने त्याची सुटका झाल्यानंतर आपला अनुभव कथन केला. यात हेनरीक म्हणतो, 'या १८ दिवसांत मी सर्वात घाबरलो पण हे घाबरणं, जिवाची भीती, दुर्गमजंगलातील श्वापदांची भीती अथवा आपण फुटीर संघटनेच्या बंधनात आहोत ही नव्हती, तर इथे आपण बंधक आहोत आणि १४ वर्षांच्या कोवळ्या बंदुकधारी मुलांनी आपल्याला वेढले आहे, घेरले आहे या विचारानेच मी हादरलो होतो. कित्येक मुलांची शस्त्रे तर त्यांच्या शरीरापेक्षाही उंच होती.
जगभरातील हिंसक, अतिरेकी गटांसाठी १६ वर्षांखालील मुलेही अत्यंत उपयोगी असा कच्चा माल असतो आणि हा कच्चा माल आपल्या गटात आणण्यासाठी विविध हतकंडेदेखील वापरले जातात. भारतात नक्षलवादी कारवायांत मुलांच्या भरतीसाठी वनवासी जनतेच्या भिन्न राहणीमानाचा, परंपरेचा व आर्थिक मागासलेपणाचा अत्यंत खुबीने वापर केला जातो.
विविध अभ्यासगटांच्या अभ्यासातील निष्कर्ष, सुरक्षा दलांच्या तावडीत सापडलेल्या नक्षलवाद्यांकरवी लहान मुलांचा नक्षली कामातील सहभाग आणि प्रणाली बहुतांश प्रमाणात स्पष्ट झाली आहे. 'बाल मिलितीया', 'क्रांिंतकारी वनवासी बालक', बाल संघमअशा विविध नावाने बालकांच्या तुकड्या मुख्य नक्षली गटांसोबत कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात गरीब वनवासी मुला-मुलींच्यादृष्टीने गणवेशधारी, सशस्त्र तुकडीचा नेता अथवा गटप्रमुख हा 'कुणीतरी' मोठा माणूस असतो. बाह्य जगत, त्याचा झपाट्याने होणारा विकास या कशाचाही स्पर्श नसणार्‍या या जगात असे नक्षली या लहान मुलांचे आदर्श, हीरो, रोल मॉडेल असतात. (आपल्यालाही लहानपणी कधी तरी आपण पोलीस इन्स्पेक्टर, आर्मी मॅन वगैरे व्हावसं वाटलेलं असतं. हा तर त्या वयाचाच परिणामअसतो.) वयाच्या १५ व्या वर्षी नक्षली गटात सहभागी झालेल्या एका महिलेने पोलिसांना व अभ्यासगटांना दिलेली माहिती यावर आणखी प्रकाश टाकणारी आहे. या नक्षली महिलेच्या गावी म्हणजेच आंध्र प्रदेशच्या वारंगतमधील एका खेड्यात नक्षलवाद्यांच्या एका तुकडीने भेट दिली होती. या नक्षली गटाकडून गायली गेलेली गाणी यामुळे प्रेरित होऊन तिने नक्षली गटात सहभाग घेतल्याचे मान्य केले. (म्हणूनच हातात काठी, खांद्यावर घोंघडं घेऊन गाणी गात हिंडणारा कवी गदर सर्वाधिक खतरनाक ठरतो) तर काही लहानग्यांसाठी हातात शस्त्र घेऊन गावातील धनाढ्य आणि विशेषत: वरच्या वर्गातील, जातीतील लोकांना घाबरवणारा 'कमांडर' हा हीरो असतो. या 'हीरोला फॉलो करणं, त्याच्याबद्दलची प्रचंड जिज्ञासा, कुतूहल या लहानग्यांना नक्षल्यांच्या जवळ घेऊन जाते!' तर काही ठिकाणी नक्षलवादी आपल्या प्रभाव क्षेत्रातील खेड्यापाड्यांत किमान एक मुलगा अथवा मुलगी नक्षली कार्यासाठी देण्याचा फतवाच काढतात. जबरदस्तीने ही मुले नेली जातात परंतु नक्षलींच्या भीतीने त्यांचे पालक पोलिसांत तक्रार देखील करीत नाहीत.
काही ठिकाणी तर गर्भवती महिलांनी नक्षली केंद्रावरच मुलांना जन्मदेण्याची सक्ती करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अभ्यासगटाला 'येलम' या ३२ वर्षीय महिला नक्षल कमांडरने दिलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. दंतेवाडाच्याच जंगलात तिने ही माहिती आयएएनएस या अभ्यासगटाला दिली. क्रांिंतकारी वनवासी महिला संघाच्या प्रशिक्षित आरोग्यसेविकांच्या मार्गदर्शनाखाली नक्षली केंद्रांत बाळांना जन्मदेण्याची सक्तीच अत्यंत अमानवी स्वरूपाची आहे. अशा केंद्रांत लहानपणापासूनच या मुलांना नक्षलवादाचे धडे दिले जातात. तुमचा जन्मएका कॉझसाठी झालाय, तुम्ही लढलं पाहिजे हे सातत्याने त्यांच्या बालमनावर बिंबवलं जातं. यासाठी अत्यंत उच्च दर्जाची प्रशिक्षणपद्धती नक्षलवाद्यांकडून वापरली जाते.
या लहान मुलांच्या तुकड्या नक्षली गटांना त्यांच्या कारवायांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. एकतर त्यांच्या वयामुळे त्यांच्यावर संशय घेतला जात नाही. हेरगिरी, सुरक्षा दलांच्या हालचालींवर या मुलांच्या माध्यमातून लक्ष्य ठेवणं नक्षलवाद्यांना सहजशक्य आणि सोप ठरते.
मुख्य गटासाठी जेवण बनविणे, हेरगिरी करणे, शस्त्रास्त्रांची ने-आण, पैशाचा पुरवठा म्हणजे ती एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं, अशा छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या कामात या लहानग्यांचा वापर नक्षली करून घेतात. सुरुवातीला आकर्षित करणारी ही वाट नंतर या मुलांना वास्तवाची जाणीव झाल्यानंतर अत्यंत भयंकर आणि भयाण वाटू लागते परंतु तोपर्यंत परतीचे मार्ग जवळपास बंद झालेले असतात. मुलांच्या या गंभीर परिस्थितीकडे दुर्दैवाने सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.
बालमजुरीच्या विरोधात आवाज उठविला जात असताना नक्षल्यांच्या तावडीतील या मुलांकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. इतकेच नव्हे तर त्यांचे उदात्तीकरण करण्याचा देखील काही वेळा प्रयत्न केला जातो.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मा।) च्या पीपल या मुखपत्रात मार्च २००५ च्या अंकात अशा बाल नक्षलींना 'सांस्कृतिक दूत' म्हटलं गेलं आहे. रिव्होल्युशन ऑफ चाईल्ड इव्होल्युशनरीज या लेखात केलेले हे समर्थन भारतीय लोकशाही व त्याच्या मूल्यांनाच दिले गेलेले आव्हान आहे परंतु दुर्दैवाने याकडे सार्‍यांचेच दुर्लक्ष होते. नक्षली गटातील बालकांच्या सहभागाची माहिती संसदेत गृहराज्यमंत्री प्रकाश जयस्वाल यांनी दिली. ११ डिसेंबर २००८ ला संसदेत बोलताना जयस्वाल यांनी सीपीआय-(मा) लहान मुलांच्या तुकड्या बनवित असल्याचे सांगितले परंतु या समस्येवर कोणत्याही प्रकारची उपाययोजना अथवा पॉलिसी अद्यापही ठरविली गेलेली नाही. चकमकीत हाती आलेल्या भरकटलेल्या या लहानग्यांचं काय करायचं? हा प्रश्न अजूनही सुरक्षा दलांना पडतो. जोपर्यंत सरकारी पातळीवर या प्रश्नाचा उकल होत नाही तोपर्यंत सुरक्षा दलांना श्रद्धांजली आणि या लहानग्यांच्या बालपणाचीच होणारी हत्या अव्याहत चालू राहणार आहे.


गौरीशंकर घाळे ९८७०४४७४६०
g.shankar1208@gmail.com







गुरुवार, २८ जानेवारी, २०१०

antarnaad

हा प्रवास कोणता आहे, कश्यासाठी आहे , कुठवर करायचा आहे किंव्हा कुठवर करावा लागणार आहे हे कदाचित आपल्यासाठी अग्यम्य आहे पण प्रवास मात्र अटल आहे।